दीपक खिलारे
इंदापूर : वालचंदनगर (ता.इंदापूर) पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील मोकाट आरोपीला अटक करण्यासाठी व या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (दि.१०) इंदापूर शहर बंदचे आवाहन वडार पँथर संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल पवार, भटक्या विमुक्त संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तानाजी धोत्रे यांनी केले आहे. तसेच सोमवारी (दि.१२) जंक्शन येथे रास्ता रोको केला जाणार आहे.
या आशयाचे निवेदन इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांना दिले आहे. यावेळी पिंटू घोडके, अविनाश चौगुले, रामा पवार, अमजद शेख, जितेंद्र विटकर, रोहिदास पवार, लखन चौगुले, बंडू पवार, दत्ता घोडके, भैया चौगुले, प्रा. बाळासाहेब लोखंडे, आबा सोनवणे,भाऊ पवार, ललेंद्र शिंदे, बाळासाहेब विटकर आदी उपस्थित होते.
तालुक्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना चिंताजनक आहेत. महिला असुरक्षित जीवन जगत आहेत. अल्पवयीन शाळकरी मुलीवरील हल्ल्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत.
याप्रकरणी संबंधित अधिकारी उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ गजाआड करावे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा यावेळी देण्यात आला.