पालघर : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक ब्यूरोला (एसीबी) राज्याच्या वन विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या घरात १.३१ कोटी रुपयांहून अधिक रोकड सापडली. या अधिकाऱ्यावर गावकऱ्यांकडून त्यांची जमीन परत मिळवण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी वनाधिकारी संदीप चौरे यांच्या घराची झडती घेतली असता ५७ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन फ्लॅटची कागदपत्रे सापडली, असे एसीबीचे डीवायएसपी यांनी सांगितले. चौरे यांच्या घरातून १,३१,९६,००० रुपयांची रोकड, ५७ तोळे सोन्याचे दागिने आणि खंडाळा, बीड येथील ५८४ चौरस फुटांच्या फ्लॅट आणि नवी मुंबईतील करंजाडे येथील अन्य एका फ्लॅटशी संबंधित कागदपत्रे सापडली, असे एसीबीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
झडतीदरम्यान एक सर्व्हिस पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाच प्रकरणी चंद्रकांत पाटील या अन्य आरोपीची कार जप्त केली आहे. २००५ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून ताब्यात घेतलेली गावकऱ्याची जमीन परत मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी चौरे आणि पालघर जिल्ह्यातील दोन जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला.