जिंतूर : शहरातील एका खासगी बँकेत काम करणारा कर्मचारी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जिंतूरमध्ये पैसे भरण्यासाठी आला असता त्याच्या पाठीवरील अडकवलेल्या सॅकमधील (बॅग) एक लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. २४) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवरं जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वैश्य नागरी सहकारी बँकेचे कर्मचारी विश्वेश संतोष कीर्तनकार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते शहरातील वैश्य नागरी सहकारी बँकेत काम करतात. बँकेतून २५ लाख रुपये घेऊन ते त्यांच्या एका साथीदारांसह सदरील रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जिंतूरमध्ये भरण्यासाठी आले होते. त्यांनी ही रक्कम पाठीवर अडकवलेल्या बॅगेत ठेवलेली होती. बँकेत रक्कम भरण्यासाठी रांगेत उभे असताना अज्ञात चोट्याने त्यांच्या बॅगेची चैन उघडून त्यामधून पाचशे रुपयाची फक्त दोन बंडल असे एक लाख रुपये चोरून नेले. हा प्रकार पैसे भरताना त्यांच्या लक्षात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरटा सीसीटीव्हीत कैद
चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरट्याचा शोध तात्काळ पोलीस लावतील, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. चोरीच्या घटना वाढल्या असून भरदिवसा अशा घटना घटत असल्याने नागरी, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या चोरट्याचा कसून शोध घेवून चोरट्यास जेरबंद केल्यास चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.