मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या तब्येतीबाबत चिंता वाढत असताना, राजकीय नेते आणि सामाजिक संघटना त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यातच महाराष्टाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनोद कांबळीच्या उपचारासाठी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 48 तासाच्या आतच शब्दपूर्ती करून विनोद कांबळी यांना मदत पोहोच केली आहे.
विनोद काही आजारांनी ग्रस्त आहे. त्याला उपचारासाठी ठाण्यातील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. खासदार श्रीकांत शिंदे यांना समजताच, दोघेही विनोदच्या मदतीला धावून आले. त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांना रुग्णालयात जाऊन विनोद कांबळी यांची भेट घेण्यास सांगितले व कांबळी यांच्या आरोग्याची माहिती घेऊन डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर करा. असे सांगितले होते.
त्यानंतर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांनी दवाखान्यात जाऊन विनोद कांबळी यांच्या तब्येतीची माहिती घेतली. व उपचारासाठी पाच लाख रुपयांची मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार केली. या घटनेला 48 तास उलटण्याच्या अगोदरच, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने कांबळी यांना ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.
कांबळी यांना हा धनादेश डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष विलास जोशी, फाउंडेशनचे विश्वस्त प्रदीप धवल आणि फाउंडेशनचे विश्वस्त जे. बी. भोर यांच्या हस्ते देण्यात आला आहे. यावेळी आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश सिंग (ठाकूर), रुग्णलयाचे डॉक्टर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक उपस्थित होते. यावेळी फाउंडेशनकडून कांबळी यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी करण्यात आली. रुग्णालयात उपचार सुरु असलेले विनोद कांबळी यावेळी भावूक झाले. कांबळी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहे.
दरम्यान, विनोद कांबळीला जेव्हा रमाकांत आचरेकर यांच्या कार्यक्रमात पाहिले तेव्हा त्याला चालायलाही येत नव्हते. बोलतानाही तो अडखळत होता. विनोद कांबळी यांना त्याचे कुटुंबिय सोडून गेले, अशीही अफवा पसरली होती. कारण विनोद कांबळीबरोबर त्याच्या कुटुंबियांनी ख्रिसमसचे औचित्य साधून जोरदार सेलिब्रेशनही केले आहे. विनोदच्या दोन्ही मुलांना यावेळी खास गिफ्ट्सही दिले असल्याचे समोर आहे. त्यामुळे विनोदचे कुटुंब त्याच्यासोबत असल्याचे दिसून आले आहे.
विनोद कांबळी यांच्या मेंदूमध्ये तपासणीदरम्यान रक्ताच्या गाठी दिसल्या आहेत. त्यांच्या आणखी काही चाचण्या घेण्यात येणार आहेत. विनोद कांबळी यांची प्रकृती आता ठीक असल्याचं समोर आलं आहे. तसेच विनोद कांबळींच्या मूत्राशयाला संसर्ग झाला असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती मिळत आहे. विनोद कांबळी यांनी उपाचारादरम्यान चांगला प्रतिसाद दिला तर त्याची तब्येत पूर्ववत बरी होऊ शकते. त्यामुळे कांबळी आता उपचारांना कसा प्रतिसाद देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. विनोद सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. काही दिवस अजून त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर विनोद आपल्या घरी जाऊ शकणार आहे. त्यामुळे कांबळे यांच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे.