सोलापूर: सोलापूर शहर व जिल्ह्यातील काही भागांत वाघ आणि बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बार्शी, माढा, उत्तर सोलापूर तालुक्यातील तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांत वाघांचा वावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक भयभीत झाले आहेत. यावर वन विभागाने आता मार्ग काढावा, यासाठी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी थेट राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून या घटनेची हकीकत सांगितली. वनमंत्री नाईक यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी. पत्र द्या, मी तातडीने आदेश देतो, असे आश्वासन दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्यासदृश प्राण्याने बार्शी तालुक्यातील काही जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घटल्या आहेत. तोपर्यंत मंगळवारी बार्शी तालुक्यातील पांगरीजवळील ढेंबरेवाडी शिवारात पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या वाघाचे छायाचित्र वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. त्यामुळे या भागात वाघांचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. बार्शीसह सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे रात्री-अपरात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे, दुसरीकडे वन विभागानेही अशा हिंस्र प्राण्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. मात्र, आता शेतकऱ्यांसह नागरिकही भयभीत झाले आहेत. त्यांनी थेट आमदार सोपल यांची भेट घेऊन या बिबट्या आणि वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. आमदार सोपल यांनी ही बाब आता थेट वनमंत्र्यांच्याच कानावर घातली आहे. त्यामुळे वन विभागाकडून आता तातडीने उपाययोजना केल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे
सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्याच्या वन अधिकाऱ्यांची होणार बैठक
सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात वाघांचा वावर असल्याचे दिसून आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आणि त्या वाघाला अथवा बिबट्याला त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्यासाठी वन विभागाच्या वतीने हालचाली वाढल्या आहेत. लवकरच यासंदर्भात दोन्ही जिल्ह्यांतील वन अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. तसेच यावर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी दिली.