पुणे: प्रजासत्ताक दिन, २६ जानेवारी २०२५ रोजी कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठामधून राष्ट्रीय सेवा योजनेतील १२ स्वयंसेवकांची निवड झाली आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चार स्वयंसेवकांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतून के.टी.एच.एम. महाविद्यालयाची (नाशिक) कविता शेवरे, भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाची वेदिका राजमाने, हुजूरपागा श्रीमती दुर्गाबाई महिला मुकुंददास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालयाची पूजा भोंडगे, एन.व्ही.पी. मंडळाचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, लासलगाव येथील स्वरूप ठाकरे असे चार स्वयंसेवक आणि महाराष्ट्र व गोवा संघाचे संघनायक म्हणून डॉ. पवन शिंगारे यांची निवड झाली.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालयाच्या वतीने राज्यस्तरावर प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरात महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामधून ३५०हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ४४ स्वयंसेवक व २ संघनायक सहभागी झाले होते. यामधून पश्चिम विभागीय निवड चाचणी शिबिराकरिता ७० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. युवा व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने आयोजित कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे झालेल्या पश्चिम विभागीय निवड चाचणी शिबिरात महाराष्ट्रातून या वर्षी सहा मुले व सहा मुलींची निवड राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन २०२५ करिता करण्यात आली आहे.