पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण ५६ शाळांमध्ये शिक्षण विभाग व आरोग्य विभागाच्या माध्यमातून झिरो वेस्ट (शून्य कचरा) प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आणखी १६ शाळांमध्ये झिरो वेस्ट प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या १०५ शाळांपैकी आसरा फाउंडेशन या संस्थेला झिरो वेस्ट (शून्य कचरा) शाळा उपक्रम राबविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील ८ शाळा प्रायोगिक तत्वावर देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ८ शाळा, दुसऱ्या टप्प्यात १६ शाळा, तिसऱ्या टप्प्यात १६ शाळा, चौथ्या टप्प्यात १६ शाळा यानुसार १०५ शाळांपैकी ५६ शाळा झिरो वेस्ट करण्यात आल्या आहेत. यापुढे झिरो वेस्ट कचरा प्रकल्प राबविण्यासाठी पुढील १६ शाळांची निवड करण्यात आली आहे.
यामध्ये अ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील निगडी येथील विद्यानिकेतन मुलांची व मुलींची शाळा, ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील काळेवाडी मुलांची व मुलींची शाळा, क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील खराळवाडी येथील उर्दू शाळा, जाधववाडी येथील उर्दू प्राथमिक शाळा, ड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील कस्पटे वस्ती शाळा, ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील भोसरी येथील मुलांची व मुलींची शाळा, फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील निगडी येथील मुलांची व मुलींची शाळा, ग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील खिवंसरा पाटील मुलींची शाळा, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा, थेरगाव उर्दू शाळा, ह क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील छत्रपती शाहू महाराज प्राथमिक शाळा, संत तुकाराम नगर प्राथमिक शाळा या शाळांचा समावेश आहे. या शाळेमध्ये झिरो वेस्ट प्रकल्प राबविण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली.