पुणे : पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात १५ क्षेत्रीय कार्यालये व केंद्रीय प्लास्टिक पथक यांच्यामार्फत दररोज दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. या कारवाईकरिता ३१ जानेवारी रोजी एकूण ४ बोलेरो गाड्या व १८ रोजी एकूण ४ बोलेरो गाड्या देण्यात आल्या होत्या. २४ डिसेंबर रोजी एकूण १० बोलेरो व्हॅन उपलब्ध केल्या असून १५ क्षेत्रीय कार्यालयांकरिता प्रत्येकी १, केंद्रीय प्लास्टिक पथकाकरिता १, घनकचरा व्यवस्थापन मुख्य विभागांतर्गत अभियांत्रिकी वर्गाकरिता १ व सॅनिटेशन विभागाकरिता १ अशा प्रकारे एकूण १८ बोलेरो वाहनांचे वाटप करण्यात आले. या वाहनांचा उद्घाटन कार्यक्रम २४ डिसेंबर रोजी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते पार पडला.
या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ क्र. १चे उपायुक्त राजू नंदकर, कार्यकारी अभियंता प्रसाद जगताप व मुकुंद बर्वे यांच्यासह परिमंडळ १ ते ५ कडील उपप्रमुख आरोग्य निरीक्षक, १५ क्षेत्रीय कार्यालयाकडील सहायक आयुक्त, आदी उपस्थित होते.
पालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांची जबाबदारी वाढलेली असून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर दोन शिफ्टमध्ये वापरून सामूहिकरित्या जास्तीत जास्त जनजागृती व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. नव्याने समाविष्ट ३४ गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ ची अंमलबजावणी केली जाणार आहे. सद्यःस्थितीत सेवकांना त्यांच्याकडील दुचाकी वाहनावर जाऊन कारवाई करावी लागत होती. ही कारवाई प्रभावीरीत्या होत नाही. मात्र, आता क्षेत्रीय कार्यालयास एक व मुख्य खात्यास तीन अशी एकूण १८ वाहने खरेदी करण्यात आली आहेत.