मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळीला प्रकृती अस्वस्थतेमुळे भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
यावेळी बोलताना विनोद कांबळी म्हणाले की, लवकरच आपण बरे होणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. “माझी फिजिओथेरेपी संपली की मी लवकरच धावायला सुरुवात करेन”, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी “कल खेल में हम हो ना हो.. गर्दिश में तारे रहेंगे सदा..भूलोगे तुम, भूलेगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा.. रहेंगे यहीं अपने निशान, इस के सिवा जाना कहा.. जीना यहाँ, मरना यहाँ इसके सिवा जाना कहा”, या आपल्या आवडत्या गाण्याच्या ओळीही निर्धारपूर्वक म्हणून दाखवल्या.
“डॉक्टरांनी मला चांगली ट्रीटमेंट दिली आहे. मला त्यांनी फिजिओथेरेपी चालू केली आहे. त्यामुळे मी थोडं थोडं चालू शकतोय. मी एवढंच सांगेन, मी लवकरच परत येईन. सगळ्यांचं आमच्या कुटुंबावर प्रेम आहे. सगळ्यांना माझ्याकडून ख्रिसमसच्या शुभेच्छा”, असेही विनोद कांबळी बोलताना म्हणाले.
विनोद कांबळी यांना झालेला आजार कोणता?
विनोद कांबळी यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचे उपचार करणारे डॉ. विवेक त्रिवेदी यांनी म्हटले आहे. विनोद कांबळी यांनी सुरुवातीला मूत्रमार्गात संसर्ग आणि वेदना असल्याची तक्रार केली होती. परंतु अनेक चाचण्यानंतर मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी मिळाल्या.
कसे होतात रक्ताच्या गाठी?
मेंदूत रक्ताच्या गाठी होणे हा गंभीर आजार आहे. या आजारात रुग्णाचा मृत्यू होण्याचाही धोका आहे. मेंदूत सतत रक्तप्रवाह सुरु असणे गरजेचे आहे. मेंदू हा शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. जर रक्त प्रवाह थांबला तर ऑक्सीजन आणि ग्लूकोजचा प्रवाह थांबतो. त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यालाच रक्ताच्या गाठी किंवा ब्लड क्लॉटिंग म्हटले जाते. जेव्हा मेंदूतील रक्तवाहिन्या बंद होतात, रक्त प्रवाह आणि ऑक्सिजन मेंदूच्या टिशूजपर्यंत पोहोचत नाही तेव्हा मेंदूच्या पेशी मरतात. ज्यामुळे न्यूरोलॉजिकल डॅमेज होते.