छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी होस्टेलवर राहून नीटची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीवर पुणे, यवतमाळ, नाशिक, हिंगोली या चार जिल्ह्यांत चार नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
निखिल अजय बगाडे (वय-२६, रा. सुभाष रोड, पिंजरा गल्ली मनमाड, नाशिक), प्रदीप शिवाजी शिंदे (वय-३०, रा. वापटी, ता. वसमत जि. हिंगोली), समाधान शिंदे (वय-२७, रा. पुणे) आणि रोहित बाळू ढाकरे (वय-२४, रा. पुसद, जि. यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय विद्यार्थिनी अभ्यासाचा ताण नको, पण काम मिळाले पाहिजे या आशेने ती ३० नोव्हेंबरला होस्टेलवरून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बाहेर पडली. रजिस्टरवर गावाकडे जात असल्याची नोंद केली. २ डिसेंबरला तिचे वडील तिला भेटण्यासाठी होस्टेलवर गेले, तेव्हा ती गावाकडेच गेल्याचे सांगण्यात आल्याने त्यांना मोठा धक्काच बसला. त्यांनी मुलीला फोन केला. पण तिचा फोन बंद येत होता.
त्यांनी सर्वत्र शोध घेऊन अखेर वेदांतनगर पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. तिचा तब्बल १८ दिवस शोध घेतला. संशयित आरोपींच्या चौकशीत आणि तांत्रिक तपास करून शेवटी ती चार दिवसांपूर्वी पुणे येथे वेदांतनगर पोलिसांना मिळून आली. मोबाईलमधील सिमकार्ड ती बदलत असल्याने तिला शोधण्यात अडचणी येत होत्या, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात पोस्कोसह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, विद्यार्थिनी होस्टेलवरून निघाल्यानंतर तिच्याकडे केवळ दोनशे रुपये होते. ती एसटी, रेल्वे आणि मिळेल त्या वाहनाने निघाली. नाशिक, यवतमाळ, हिंगोली आणि पुणे येथे गेली. यावेळी तिच्यावर यवतमाळ येथे रोहित ढाकरे, वसमत परभणी येथे प्रदीप शिंदे, नाशिकच्या मनमाडला निखिल बगाडे आणि पुणे येथे समाधान शिंदे यांनी बलात्कार केला असल्चेयाची माहिती पोलिसांनी दिली, यातील निखिल हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तर उर्वरित तिन्ही आरोपी अविवाहित आहेत.