जेजुरी : पुरदंर तालुक्यातील जेजुरी येथे सावकारांच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. रवींद्र पारखे असं या व्यक्तीचे नाव असून सध्या ते जेजुरी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून मागील 24 तासांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. जेजुरी पोलिसांनी या प्रकरणी सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे.
श्री. पारखे यांनी याबाबत सुसाईड नोट लिहून ती सोशल मीडिया मध्ये व्हायरल केली. आपली मुलगी व अन्य नातेवाईकांना सुद्धा त्यांनी ही चिठ्ठी पाठवली आहे. यात सर्व सावकारांची नावे, कर्जाची रक्कम, त्यांना आत्तापर्यंत दिलेले पैसे आणि त्यांचा मोबाईल नंबरसह पत्ता लिहिलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात पुरंदरच्या सावकारांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. तिप्पट व्याज देऊनही सावकार आपल्याला त्रास देत आहेत म्हणून आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी यात म्हटले आहे.
सावरकारांच्या क्रुरतेचा हा प्रकार कळताच पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी पोलिसांना सक्त सूचना करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिंदे व सहाय्यक पोलीस दिपक वाकचौरे निरीक्षक यांना शिवतारे यांनी तत्काळ कल्पना दिली. दरम्यान, पोलिसांनी सावकारांच्या मुसक्या आवळायला सुरवात केलेली असून रातोरात तीन सावकार पोलिसांनी अटक केले.
मोहन ज्ञानदेव जगताप, संभाजी विश्वासराव जगताप, गुलाब अर्जुन जगताप, अनिकेत जगताप, अक्षय चौखंडे, गिरीश हाडके, आशिष रोकडे, तुषार पवार, अक्षय इनामके , अनिल वीरकर, पंकज निकुडे अशी सावकारांची नावे चिठ्ठीत नमूद केलेली आहेत. यापैकी मोहन जगताप, संभाजी जगताप आणि अक्षय ईनामके यांना पोलिसांनी अटक केलेली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
सावकारीने त्रस्त लोकांनी संपर्क करावा – शिवतारे
झालेला प्रकार अत्यंत गंभीर आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे. तालुक्यातील अन्य कुणाचा अशा पद्धतीने सावकारांकडून छळ सुरू असल्यास थेट माझ्या कार्यालयाशी किंवा माझ्याशी संपर्क साधावा. त्यांच्या रक्षणाची आणि सावकारांच्या बंदोबस्ताची जबाबदारी माझी राहील, असे आवाहन आमदार विजय शिवतारे यांनी केलेले आहे.