कोलकाता : पतीच्या संमतीशिवाय पत्नी तिच्या माहेरकडील नातेवाईक, मित्र- मैत्रिणींना अनेक दिवस घरी ठेवत होती. तसेच पतीविरोधात तिने कौटुंबिक छळाचा खोटा गुन्हा दाखल केला होता. ही मानसिक क्रूरता असल्याचे निरीक्षण नोंदवत या आधारावर कोलकाता उच्च न्यायालयाने व्यक्तीच्या बाजूने निर्णय देत घटस्फोटाची मागणी मंजूर केली.
न्यायमूर्ती सब्यसाची भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पतीला घटस्फोट नाकारणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय विकृत व त्रुटीयुक्त असल्याचे नमूद करत फेटाळून लावला. याचिकाकर्त्यांने त्याच्या पत्नीविरोधात मानसिक छळाचे पुरेसे पुरावे सादर केले असून, या आधारावर त्याची घटस्फोटाची मागणी मंजूर करण्यात येत असल्याचे खंडपीठ म्हणाले. याचिकाकर्ता पती पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील कोलाघाटचा रहिवासी असून, तो सरकारी नोकरीत आहे.
या दाम्पत्याचे १५ डिसेंबर २००५ साली लग्न झाले होते. मात्र, पत्नीच्या छळाला वैतागून पतीने २५ डिसेंबर २००८ रोजी घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. तर त्याच वर्षी पत्नीने पती व सासरकडील लोकांविरोधात कौटुंबिक छळाची तक्रार केली होती. पतीच्या दाव्यानुसार त्याची पत्नी तिचे मित्र व माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेत अनेक दिवस घरी ठेवत होती. कधीकधी पत्नी घरी नसतानाही तिचे मित्र, नातेवाईक पतीच्या घरी राहत होते. याबाबत त्याने सादर केलेले पुरावे मानसिक छळाचा आरोप सिद्ध करण्यास पुरेसे असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.
विद्यमान प्रकरणात पत्नी अनेक वर्षांपासून पतीसोबत वैवाहिक आयुष्य जगण्यास नकार देत आहे. दोघांमधील वैवाहिक संबंध सुधारण्याच्या पलीकडे गेल्याचे दिसते, असेही खंडपीठाने नमूद केले. २००५ ते २००८ या कालावधीत पत्नी कोणतीही तक्रार न करता पतीसोबत राहिली. यानंतर ती तिच्या आईसोबत राहत होती. यावरून तिने पतीवर केलेले छळाचे आरोप तथ्यहीन असल्याचे सिद्ध होते, असेही न्यायालयाने म्हटले.