पुणे : वाघोली बाजारतळमध्ये मंगळवारी (दि. २४) बाजाराच्या दिवशी बाजारामध्ये दहशत माजवणाऱ्या कोयता गॅंगला वाहतूक पोलीस व तपास पथकाने पाठलाग करून पकडले. तिघांना ताब्यात घेतले असून तीन ते चार जण फरारी झाले असल्याची माहिती पुढे येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील आव्हाळवाडी फाट्यावर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संदीप पाटील वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी त्यांना वाघोली येथील बाजारामध्ये पाच-सहा जण कोयता घेऊन मारामारी करत दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस हवालदार पाटील व तेथे उपस्थित असलेल्या तपास पथकाच्या महिला कर्मचारी आर. एम. मोरे हे घटनास्थळी पोहोचले. पोलीस दिसताच आरोपी गर्दीतून रायसोनी कॉलेज रस्त्यावरून पळून जाऊन पाण्याच्या टाकीजवळ लपून बसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून तिघांना पकडले.
मात्र, अन्य तीन ते चार जण दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, पोलीस तपास पथकानेदेखील बाजारतळमध्ये धाव घेतली. कोयता गँगच्या तीन जणांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्यांच्याकडून एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली. पळून गेलेल्या इतरांचा तपास वाघोली पोलीस करत आहेत.
वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संदीप पाटील, रवींद्र माने, सागर चौधरी, बाळासाहेब हराळ, महिला कर्मचारी आर. ए. मोरे व तपास पथकाचे कर्मचारी यांनी कामगिरी बजावली.