पिंपरी (पुणे): कारमधील तीन जणांनी खासगी आराम बसचालकाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. २३) कासारवाडी पोलीस चौकीजवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. संतोष अंकुश जाधव (वय ४४, रा. दत्त मंदिर रोड, क्रोमा शोरुमच्या पाठीमागे, वाकड) असे मारहाणीत जखमी झालेल्या चालकाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. २३) याबाबत दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रामदास रेवबा नागरे (वय ३८), नितीन भास्कर उगलमुगले (वय २६, दोघे रा. पिंपळे सौदागर), विजय मच्छिंद्र आव्हाड (वय ४२, रा. वाशी, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आरोपी (एमएच १४ केएफ ८६५३) या कारमधून आले. त्यांनी नाशिकहून कोल्हापूरला चाललेली खासगी आराम बस (एमएच ०९ जीजे ३६९०) ही कासारवाडी पोलीस चौकीजवळ थांबविली. चालक संतोष जाधव यांच्या बसच्या काचा लोखंडी रॉडने तोडत असताना फिर्यादी यांचा जीव जाऊ शकतो, हे माहिती असतानाही मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी संतोष जाधव यांच्या डोक्यातही मारहाण केली. फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने फिर्यादी रोडवर ‘खाली पडले आणि बेशुद्ध झाले. पोलिसांनी तपास करत तिघांना अटक केली.