बेल्हे : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका मेंढीचा मृत्यू झाला. जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे मंगळवारी (दि. २४) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. राजुरीतील संजय रभाजी हाडवळे यांच्या गट क्रमांक १०९ मधील शेतात मेंढपाळ खंडू मारुती हांडे (रा. कन्हेर पोखरी, ता. पारनेर) यांच्या शेळ्या-मेंढ्यांचा कळप बसलेला होता.
याच कळपावर बिबट्याने हल्ला चढवून एका मेंढीचा फडशा पाडला. बिबट्याने दुसऱ्या मेंढ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र, मेंढ्यांच्या आवाजाने हांडे यांना जाग आली. त्यांना बिबट्या दिसल्याने आरडाओरड केली असता बिबट्याने तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला.
पिंपळवंडीत बिबट्या जेरबंद
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील तोतर मळ्यातील वसंत विठ्ठल ठोकले यांच्या शेतामध्ये वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि. २४) बिबट्या जेरबंद झाला. हा बिबट्या सुमारे तीन वर्षांचा असून, त्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आल्याची माहिती ओतूरचे वनक्षेत्रपाल लहू ठोकळ यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना ठोकळ म्हणाले की, तोतरबेट येथील प्रवीण पंढरीनाथ काकडे यांनी परिसरामध्ये बिबट्या असल्याचे कळविले होते. तसेच बाजूला शाळा असल्यामुळे व दररोज सायंकाळी बिबट्या या ठिकाणाहून ये-जा करत असल्याचे आम्ही स्वतः पाहिल्याचे त्यांनी सांगितल्याने वन विभागाने तेथे तीन दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यामध्ये बिबट्याला भक्ष्य म्हणून कोंबडी देखील ठेवण्यात आली होती. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला. त्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.