इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. निमगाव केतकी येथील जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या बाह्यवळणात अडसर बनत असलेली ३ हजार ६०० स्क्वेअर फुटांची तीन मजली इमारत मूळ जागेवरून उचलून ७५ फूट पुढे ठेवण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने जशीच्या तशी अडीच महिन्यांमध्ये सुरेश म्हेत्रे व संजय म्हेत्रे या बंधूंने हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्यांच्या या प्रयोगाने सर्वत्र कुतूहल आणि चर्चा होत आहे.
म्हेत्रे बंधूंची २३ बाय ४३ फूट आकाराची इमारत सध्याच्या गावठाणातून जाणाऱ्या पालखी मार्गालगत आहे. मात्र, त्यांच्या इमारतीच्या मागील बाजूनेच बाह्यवळण जात असल्याने व या रस्त्याच्या कामात इमारत पाडावी लागत आहे. त्यामुळे त्यांनी ही इमारत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने पुढे सरकवण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी मागील वर्षी काटेवाडी या ठिकाणी इमारत दहा फूट सरकवण्याचा यशस्वी झालेला प्रयोग म्हेत्रे बंधूंनी पाहिला होता. इमारत ७५ फूट बाजूला उचलून ठेवण्यासाठी १६ लाख रुपये एवढा खर्च असून, हे काम हरियाणामधील पानिपत येथील ठेकेदार मोहनलाल दरसाल यांना देण्यात आलेले आहे.
याबाबत बोलताना ठेकेदार मोहनलाल म्हणाले कि, ही बिल्डिंग २५० जॅकच्या साह्याने व रोज ५० कामगारांच्या मदतीने सरकवण्यात आली आहे. इमारत जागेवर चार फूट उचलण्यासाठी एक महिन्याचा कालावधी गेला व पुढे ७५ फूट सरकवण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी गेला. इमारत पुढे सरकवण्याचे काम सोमवारी (दि. २३) पूर्ण झाले. सध्या फुटिंग भरण्याचे काम आठ दिवसांत पूर्ण होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितले.