वाघोली : पुण्यातील वाघोली येथून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तोटरे नावाच्या डंपरचालकाने केसनंद फाटा येथे मध्यरात्री झोपलेल्या ९ जणांना चिरडण्याअगोदर बाइफ रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेजारील ग्राहक सेवा केंद्र या दुकानाला जोरदार धडक दिल्याचे समोर आले आहे. दुकानाच्या शटरचे तसेच भिंतीचे डंपरच्या धडकेमध्ये नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानाला दिलेल्या धडकेबाबत सकाळी दुकानदार यांना समजले. तसेच केसनंद फाटा येथे डंपरने ९ जणांना चिरडल्याच्या घटनेबाबत समजले. या डंपरच्या पुढील बाजूकडील असणारा आरसा दुकान परिसरात सापडला आहे. डंपरवर शटर, तसेच भिंतीचा रंगदेखील दिसून आला आहे. याबाबत खात्री झाल्यानंतर दुकानाच्या नुकसानीबाबत पोलिसांना दुकानदाराने कळवले आहे. डंपरचालकाने मद्यधुंद अवस्थेत बाइफ रोडवरील टपरीचालकाबरोबर वाद घातला आहे, असे तेथली नागरिकांनी सांगितले आहे.
दरम्यान, तेथून पुढे जाऊन दुकानाला धडक दिली. त्यानंतर डंपर घेऊन तो हायवेवर आला. बँके जवळ असणाऱ्या दुकानाचे व घराचे रिनोव्हेशनचे काम सध्या सुरू आहे. या टपरीच्या धडके नंतर केसनंद फाटा येथे झोपलेल्या कुटुंबाला चेंगरण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकाच दिवशी दोन ठिकाणी या मध्यधुंद अवस्थेतील डंपर चालकाने अपघात घडवून आणले आहेत.
सलग दुसऱ्या दिवशी डंपरची दुचाकीला धडकला; तरुण गंभीर
वाघोलीतील केसनंद फाटा परिसरामध्ये डंपरने ९ जणांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी पहाटे डंपरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना वाघोलीतील लोहगाव चौक परिसरात घडली आहे. यामध्ये दुचाकी व डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. साईराज देशमुख असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या धडकेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.