-बापू मुळीक
सासवड : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत विविधतेतून एकतेचा संदेश देत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
यावर्षी स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. सुमंत वाघोलीकर तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते प्रसिद्ध ढोलकी वादक प्रल्हाद कदम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे तसेच, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव सुधीर भोसले, शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, शंतनु सुरवसे, शिक्षक प्रतिनिधी सुरेखा जगताप, पालक प्रतिनिधी मनिषा टिळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे यांनी प्रास्ताविकातून शाळेचा अहवाल सादर करत शाळेच्या शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील यशप्राप्तीवर प्रकाश टाकला. दिपक कांदळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी, वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना, पालक, शिक्षक यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. या बक्षिसांची नावे नरेंद्र महाजन यांनी घोषित केली. त्यानंतर, विविधतेतून एकता या संकल्पनेखाली विविध राज्यांची झलक दाखविणारी नृत्य, नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. इ. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी गुजरात, पंजाब, राजस्थान, गोवा, महाराष्ट्र, जम्मू – काश्मिर, तामिळनाडू, केरळ या राज्यांची सांस्कृतिक परंपरांचा वेशभूषा, भाषा आणि नृत्यातून परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनी या सादरीकरणातून विविधतेतून एकतेचा संदेश दिला.
सूत्रसंचालन स्वाती बोरावके , अश्विनी कदम यांनी केले. आभार सुरेखा जगताप यांनी मानले.