मुंबई : महायुती सरकारला सत्तेत पुन्हा आणण्यासाठी लाडकी बहीण योजना चांगलीच कारगर ठरली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्याची टीका विरोधकांकडून होत असते. आता, सरकारी तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी राज्यात मद्य विक्रीचे परवाने वाढवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. या मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी बोचरी टीका केली आहे. हे सरकार लाडक्या बहिणीचे नवरे आणि भाऊ दारुडे करणार असल्याचा टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणकले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, लाडक्या बहिणीला 1500 रुपये देण्यासाठी लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहे. मद्य विक्रीचे परवाने वाढवून दारू बंदीही कमी करतील. त्याशिवाय, घरपोच दारू असे काहीही करून लाडक्या बहिणींना 1500 रुपये द्यावे असे सरकारचे एक व्हिजन असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. बहिणींना पंधराशे द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणीच्या घरात बेवडे नवरे भाऊ मुलं निर्माण करायचे धोरण दिसत असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारा हा निर्णय असून अजित पवारांसारखा नेता महसूल वाढवण्यासाठी याबाबतीत विचार करत असेल राज्याचे दुर्दैव असेल असेही राऊत म्हणाले.
अधिकाऱ्यांचा प्रस्ताव लाडक्या बहिणींचा वाढणार ताप…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर अधिकाऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी काही प्रस्ताव सादर केले असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात लाडकी बहीण योजनेसह विविध योजना सुरू आहेत. या योजनांच्या आर्थिक तरतुदीमुळे तिजोरीवर मोठा भार येत आहे. त्यामुळे आता सरकारने महसूल वाढीसाठी मद्यविक्रीसाठी नवीन परवाने सुरू करावे असा प्रस्ताव अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.