जम्मू आणि काश्मीर : जम्मू आणि काश्मीरमध्ये मंगळवारी (ता.24) लष्कराच्या ट्रकचा मोठा अपघात झाला आहे. या गंभीर अपघातात पाच जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. पूंछ सेक्टरमधील मेंढर भागात लष्कराचा ट्रक चुकून 300 फूट खोल दरीत कोसळल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती ‘व्हाइट नाइट कॉर्प्स’नं एक्सवर दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या या ट्रकमध्ये 8 ते 10 जवान होते. हा ट्रक नीलम मुख्यालयाकडून बलनोई घोरा पोस्टकडे जात असताना 11 एमएलआयच्या घोरा पोस्टजवळ अपघात झाला. यावेळी लष्कराचा ट्रक जवळपास 300 ते 350 फूट खोल दरीत कोसळला. यामध्ये पाच जवानांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच तत्काळ बचाव मोहीम राबवण्यात आली आहे. बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून जखमींसाठी मदत कार्य सुरु केले. सैन्य दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी पोहचून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या भीषण अपघातात 5 जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर इतर जवान जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने अधिकृत एक्स अकाऊंटवरुन दिली.
तसंच त्यांनी मृत जवानांबद्दल शोक व्यक्त केला. व्हाईट नाईट कॉर्प्सने पोस्टमध्ये लिहिलं ‘पुंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटीवर असताना वाहन अपघातात 5 शूर जवानांच्या दुःखद मृत्यूबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. जखमी जवानांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे.’