पुणे : पुण्यातील अपघातांची मालिका सूरुच आहे. वाघोलीत झालेल्या भीषण अपघातानंतर आता पुन्हा पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील खडकीजवळील विसावा हॉटेलजवळ झाला.
नेमका अपघात कशामुळे?
नेमका अपघात कशामुळे झाला याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, लक्झरी बसने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तत्काळ मदत कार्य सुरू करून भिगवण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
जखमींवर उपचार सुरु..
महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी काही तासांत कार्यवाही केली. अपघाताची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून यातील जखमींच्या स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की, अपघात ट्रक आणि बसच्या वेगाच्या तफावतीमुळे झाला असावा. या अपघाताने पुणे-सोलापूर महामार्गावर सुरक्षा नियमांचे पालन आणि वाहतूक नियंत्रण किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.