पुणे : वाघोलीमध्ये मद्यधुंद डंपर चालकाने नऊ जणांना चिरडल्याची घटना ताजी असताना आता पुण्यात पुन्हा एक अपघाताची घटना घडल्याचे समोर आले आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चारचाकी गाडी चालकाने अनेक वाहनांना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चतुश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. दयानंद केदारी असं गाडी चालकाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून गाडी चालवताना तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पुण्यातील मध्यवर्ती भागातून जात असताना त्याने अनेक दुचाकींना धडक दिल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. यात वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.
मद्यधुंद चालकाला नागरिकांकडून चोप..
या घटनेनंतर नागरिकांनी त्याला पडकडून चांगलाच चोप दिला आहे. तसेच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, रविवारी मद्यधुंद डंपर चालकाने वाघोली परिसरात फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं होतं. यात दोन चिमुकल्यांसह तिघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली होती. तसेच डंपर मालकालाही ताब्यात घेतलं होतं. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा मद्यधुंद चालकाने वाहनांना धडक दिली आहे. या घटनांनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत होतो आहे. या अपघातांना आळा कधी बसणार? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.