वाघोली (पुणे) : वाघोली अपघात प्रकरणामध्ये डंपर मालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. डंपरवरील चालक हा मद्यप्राशन करत असल्याची माहिती मालकाला होती. डंपर मालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून पोलिसांनी अटक केली आहे. अनिल काटे (वय ३९, रा. दापोडी) असे अटक करण्यात आलेल्याचे डंपर मालकाचे नाव आहे.
वाघोलीतील केसनंद फाटा येथे सोमवारी मध्यरात्री भरधाव डंपरने पदपथावर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले होते. या अपघातात दोन बालकांसह तिघांचा मृत्यू झाला. अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. पदपथावर झाेपलेले सर्व जण अमरावती जिल्ह्यातील असून, ते मजुरीसाठी पुण्यात आले होते. अपघात प्रकरणात वाघोली पोलिसांनी सोमवारी डंपर चालक गजानन शंकर तोटरे (वय २६, सध्या रा. केसनंद, मूळ रा. पाळा, ता. मुखेड, जि. नांदेड) याला अटक केली. त्याला न्यायालयाने २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांकडून डंपर मालक अनिल काटे याला वाघोली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले. डंपर चालक तोटरे याला दारु पिण्याचे व्यसन होते. याबाबतची माहिती डंपर मालक काटे याला होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. डंपर चालक तोटरे याने डंपरमधील माल आव्हाळवाडी परिसरात उतरविला होता. त्यानंतर तो डंपर घेऊन घरी निघाला होता. डंपरमध्ये त्याने मद्य प्राशन केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी काटेला अटक केली, अशी माहिती वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी दिली आहे.
मृतांवर अमरावतीमध्ये अंत्यसंस्कार..
अमरावतीमधून पुण्यात मजूरी करण्यासाठी आलेल्यांची परिस्थिती हलाखीची आहे. वाघोलीतील अपघातात विशाल विनोद पवार (वय २२), वैभवी रितेश पवार (वय १ वर्ष) आणि वैभव रितेश पवार (वय २ सर्व रा. अमरावती) या तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह घेऊन जाण्यासाठी मजुरांना वाहन उपलब्ध होत नव्हते. प्रशासनाने त्यांना वाहन उपलब्ध करुन दिले, तसेच त्यांना अमरावतीत जाण्यासाठी बस उपलब्ध करुन दिली. अमरावतीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तसेच अपघातातील गंभीर जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.