लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस लहान मोठे अपघात होत आहे. या अपघातात अनेक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर काही नागरिकांचे अवयव निकामी झाले आहेत. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ही दोन्ही गावे दळणवळणाच्या महत्वाची असून लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी आहेत. या दोन्ही गावांच्या हद्दीतील महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व फुरसुंगी शिवरस्ता होणे फायद्याचे आहे. हा रस्ता भविष्यात तिन्ही गावातील नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे. असे मत नवपरिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी केले आहे.
पुढे बोलताना चित्तरंजन गायकवाड म्हणाले की, हा शिवरस्ता लोणी काळभोर गावातील महादेव मंदिर, घोरपडे वस्ती, बोपदेव मंदिर, पांडवदंड, गायकवाड वस्ती व कवडीपाट टोल नाक्यापर्यंत बनविण्याचे नियोजन सुरु आहे. यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे. निधी मंजूर झाल्यानंतर लवकरच कामाला सुरवात होईल.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एच पी गेट, लोणी स्टेशन, एमआयटी कॉर्नर व लोणी कॉर्नर या चौकांमध्ये नेहमी वाहतूक कोंडी होत असते. तसेच या ठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी नेहमी अपघात होतात. मात्र लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व फुरसुंगी हा शिवरस्ता झाला तर याचा लाखाहून अधिक नागरिकांना फायदा होईल. या शिवरस्त्याचा वापर शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थ करतील. व नक्कीच अपघाताचे प्रमाण कमी होईल. आणि शाळकरी विद्यार्थी सुखरूप शाळेत पोहचतील, असे गायकवाड यांनी सांगितले आहे.
विरोधाला विरोध करू नये…
सर्व निर्णय हे जनतेच्या विकासासाठी व हितासाठी असणे आवश्यक आहे. नागरिकांसह विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा. यासाठी शिवरस्ता तयार झाला पाहिजे. यामध्ये कोणीही आपल्या फायद्यासाठी राजकारण करू नये. जर कोण चांगले काम करीत असेल तर विरोधाला विरोध दर्शविण्यासाठी विरोध करू नये. काही विरोधक जनतेस वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र जनता ही सुज्ञ व जागृत आहे. व ती योग्य निर्णयाला पाठींबा देईल. त्यामुळे विरोधकांनी कितीही उड्या मारल्या तरी याचा त्यांना काडीमात्रही फायदा होणार नाही. तसेच गावाच्या विकासासाठी सर्व जनतेने ग्रामसभेला उपस्थित राहावे.
-चित्तरंजन गायकवाड (संस्थापक अध्यक्ष, नवपरिवर्तन फाउंडेशन, लोणी काळभोर)