पिंपरी : पिंपरी-चिंचवड मनपाच्या जलतरण तलावांचे खासगीकरण न करता त्याचे संचालन आणि व्यवस्थापन महापालिकेने करावे, अशी मागणी वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष सलीम सय्यद, सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे, सदस्य जाकीर, हुसेन सय्यद, इक्बाल आत्तार, रवींद्र काळे यांनी आयुक्तांना निवदेन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, की महापालिकेच्या मालकीचे एकूण १४ जलतरण तलाव आहेत. यापैकी १० जलतरण तलाव तीन वर्षांसाठी ठेकेदार संस्थांना चालविण्यास दिले आहेत.
खासगी ठेकेदारांकडे तलावांची जबाबदारी दिल्यानंतर विविध अपघात झाले आहेत. २०२३ मध्ये संभाजीनगर येथील जलतरण तलावात १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा जीवरक्षक नसल्याने बुडून मृत्यू झाला होता. तसेच ऑक्टोबर २०२३ मध्ये कासारवाडी येथील जलतरण तलावात क्लोरीन वायूची गळती होऊन १७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लोकाभिमुख कारभाराचा विचार करता सर्वच ठिकाणी फायद्या- तोट्याचा विचार प्रशासनाने करू नये. जलतरण तलाव व्यवस्थापन, संचालन ही मनपाची नागरी सेवा असून त्याचे खासगीकरण करू नये, तेथे मनपाने स्वतःचे कर्मचारी जीवरक्षक आणि इतर कर्मचारी नियुक्त करून देखभाल दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.