-राजु देवडे
लोणी धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मंचर, पारगाव, पोंदेवाडी, लोणी या गावांमध्ये जाणारी एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी पोंदेवाडी ग्रामपंचायतने मंचर आगार व्यवस्थापकडे पत्राद्वारे केली आहे.
मंचर, पारगाव, पोंदेवाडी, लोणी या मार्गावर प्रवासी वाहतुकीचे दुसरे कोणतेही साधन नाही. पोंदेवाडी गावामधून मंचर आगारामार्फत मंचर ते पोंदेवाडी ही बस सेवा सायंकाळी 5.30 वा सुरु होती. ती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना व स्थानिक नागरिकांना जाण्या-येण्याची गैरसोय होत आहे.
सदर एस.टी सेवा सुरु व्हावी. तसेच वडगावपीर मुक्कामी जाणारी एस.टी सेवा सकाळी 7.00 वा पोंदेवाडी गावांमधून मंचरकडे जात होती व सायंकाळी 8.00 वा पोंदेवाडी मार्गे वडगावपीर मुक्कामी येत होती. त्यामुळे नागरिकांना प्रवास करणे सहज शक्य होत होते .आता सदर एस.टी.सेवा बंद आहे. या मार्गावर बससेवा नसल्यामुळे या भागातील प्रवाशांना खासगी वाहनाने मुख्य रस्त्याकडे यावे लागते आहे.
यातून प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. बंद असलेली एसटी बस सेवा पूर्वत करावी, अशी मागणी पोंदेवाडी गावच्या सरपंच नीलम वाळुंज व शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी केली आहे.