शिक्रापूरः कान्हूर मेसाई (ता. शिरुर) या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या गावातील एका ट्रक चालकाच्या मुलाने आपल्या आई-वडिलांचे मुलाला फौजदार बनवण्याचे स्वप्न साकार केले असून ट्रक चालकाचा मुलगा विक्रांत तळोले हा पोलीस उपनिरीक्षक झाल्याने त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कान्हूर मेसाई (ता. शिरुर) या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या गावातील अशोक तळोले हे शेती करत ट्रकवर चालक म्हणून काम करतात. त्यांच्या पत्नी चंद्रभागा यांनी शेतीमध्ये झोकून देत आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करत अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले. तर त्यांचा मुलगा विक्रांत याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावात पूर्ण करत शिरुर येथून पदवीचे शिक्षण घेऊन नंतर पुण्यातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला.
कोरोनाच्या काळात पुण्यातच रूमवर अभ्यास केला. सोशल मीडियापासून पूर्णपणे लांब असायचा, विक्रांतने यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. नुकतेच शासकीय पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण विक्रांत तळोले याने पूर्ण करुन आपल्या आई वडिलांचे मुलगा अधिकारी झाला पाहिजे हे स्वप्न त्याने पूर्ण केले. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही तेवढा आनंद रात्री घरी आल्यावर आपल्या वडिलांना मिठी मारल्यानंतर झाल्याचे विक्रांत म्हणाला.