पुणे : नाताळ सणानिमित्त लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात नाताळ सणानिमित्त मोठी गर्दी होते. संभाव्य गर्दी विचारात घेऊन या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत.
नाताळ सणानिमित्त लष्कर भागात नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्यावर गर्दी वाढल्यास वाहतूक बंद ठेवण्यात येईल. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बुधवारी सायंकाळी 7 पासून बदल करण्यात येणार आहेत. गर्दी ओसरेपर्यंत या भागात वाहतूक बदल लागू राहणार आहेत. वाय जंक्शन येथून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक येथे बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक कुरेशी मशीद, सुजाता मस्तानी चौकातून वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून अरोरा टॉवर्सकडे येणारी वाहतूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून तीन तोफा चौकाकडे सोडण्यात येणार आहे.
तसेच व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, या भागातील वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. इंदिरा गांधी चौकातून वाहने लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.