पिंपरी: लिफ्टमध्ये जात असणाऱ्या महिलेला हातोडीने मारहाण करून दीड तोळे वजनाची सोनसाखळी लंपास केल्याची घटना सांगवी येथे घडली. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखांनी तपासचक्रे फिरवत तसेच सलग ७२ तास शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासून अखेर चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. ईश्वर कैलास वाल्हेकर (वय ३४, रा. बौद्धनगर, एमआयडीसी पिंपरी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ डिसेंबर रोजी फिर्यादी महिला ट्युशन घेण्यासाठी लिफ्टमधून जात असताना त्यांच्या मागून आलेल्या चोरट्याने हातोडीने मारहाण केली. त्यानंतर महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची गांभीर्य ओळखून सर्व गुन्हे शाखांना तपासाच्या सूचना देण्यात आल्या.
त्यानुसार पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट ४, मालमत्ता गुन्हे विरोधी पथक व गुंडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक. तयार करण्यात आले. या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळ परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तीन दिवस व रात्र तपासणी केली. दरम्यान एक संशयित व्यक्ती बनावट नंबरप्लेट लावलेल्या दुचाकीवरून पळून जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्यावरून आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.