जयपूर: राजस्थानमध्ये एका शेतकऱ्याला आत्महत्या करण्यापासून रोखल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडेच सुरक्षेचा खर्च मागितल्याची अजब घटना समोर आली आहे. पोलिसांनी शेतकऱ्याला तब्बल ९.९१ लाख रुपयांची नोटीस बजावली आहे. भूसंपादनाचा मोबदला मिळत नसल्याने या शेतकऱ्याने राष्ट्रपतीच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आत्महत्येचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्याला टोकाचे पाऊल उचलण्यापासून रोखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता,
झुंझुनू जिल्ह्याच्या गोठडा गावातील शेतकरी विद्याधर यादव हे भूसंपादनाचा मोबदला मिळत नसल्याने त्रस्त होते. एका सिमेंट कारखान्यासाठी यादव यांची जमीन घेण्यात आली होती. मोबदल्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासन व सिमेंट कंपनीच्या व्यवस्थापनाकडे वारंवार विचारणा केली. पण कुठल्याही प्रकारचे उत्तर मिळत नसल्याने अखेर त्यांनी ९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रपतींच्या नावाने एक निवेदन दिले. यात त्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागितली होती. तसेच समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत मुदत दिली होती.
यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने खबदारी म्हणून यादव यांच्या सुरक्षेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला. यादव यांनी पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना आत्मदहनापासून रोखले. यानंतर सिमेंट कंपनीने तातडीने यादव यांना ३.८०. कोटी रुपयांचा मोबदला देखील दिला. हा विषय संपला असे यादव यांना वाटत असतानाच पोलिसांनी त्यांना बंदोबस्तासाठी आलेल्या खर्चापोटी ९.९१ लाख रुपयांची नोटीस पाठवली आहे.
शेतकरी विद्याधर यादव यांच्या सुरक्षेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ९९ पोलिसांना तैनात करण्यात आले होते. यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडल्याने ही नोटीस बजावण्यात आल्याचे झुंझुनूचे पोलीस अधीक्षक शरद चौधरी यांनी सांगितले. मात्र, आपली सगळी जमीन आणि घर मोबादला न देता घेण्यात आल्याने आपल्याकडे आत्महत्येशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. त्यामुळे आपण तसे निवेदन दिले होते, अशी हतबलता यादव यांनी व्यक्त केली. आपण कधीही सुरक्षेची मागणी केली नवहती. जिल्हा प्रशासन व पोलिसांनी सुरक्षा दिली होती. पण आता मला वसुलीसाठी नोटीस पाठविण्यात आल्याचे यादव यांनी म्हटले.