मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीसंदर्भात येत्या ८ ते १० दिवसांत भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होणार असून भुजबळ यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद देऊन त्यांची नाराजी दूर केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
नाराज भुजबळ यांनी कोणताही वेगळा निर्णय घेऊ नये, महायुतीतील ऐक्य कायम राहावे, यासाठी फडणवीस यांनीच पुढाकार घेतला असून भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवून केंद्रात मंत्री करण्याचा तोडगा काढला आहे. त्यांच्या या यशस्वी शिष्टाईने भुजबळ यांचे बंड थंडावण्याची शक्यता आहे. सरकारमध्ये मंत्रीपद नाकारल्यापासून भुजबळ नाराज आहेत. मंत्रीपद न मिळाल्याने नागपूरमधील हिवाळी अधिवेशनातून पहिल्याच दिवशी काढता पाय घेऊन भुजबळ यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला. अधिवेशन सोडून नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी समर्थकांचा मेळावा घेतला. ‘आपण जो निर्णय घ्याल, त्याच्यासोबत आम्ही असू’, असा शब्द त्यांनी समता परिषदेच्या अनुयायांकडून घेतला. भुजबळ यांनी त्यानंतर राज्यातील तसेच देशातील ओबीसी नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली, काही नेत्यांनी त्यांना समर्थन दिल्याने भुजबळ मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत होते.
भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शिवसेनेची (ठाकरे) दारे खुली असल्याची वक्तव्ये त्या पक्षातून आली. दुसरीकडे काही ओबीसी नेत्यांनी भुजबळांनी एक तर भाजपमध्ये जावे किंवा ओबीसींचा स्वतंत्र पक्ष स्थापन करून रस्त्यावर संघर्ष करावा, असा सल्ला दिला. भुजबळांना राज्यात किंवा केंद्रात मंत्रीपद देऊन ओबीसींचा सन्मान करावा, अशी मागणीही काही ओबीसी नेत्यांनी केली. त्यात ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे, प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके आदी नेत्यांचा समावेश होता. काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार, नाना पटोले तर महसूलमंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काही नेत्यांनी भुजबळ यांची पाठराखण केल्याचे यादरम्यान दिसून आले.
पटेल यांचे मंत्रीपद पुन्हा हुकणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेत १, तर राज्यसभेत ३ खासदार आहेत. राष्ट्रवादीला केंद्रात एक मंत्रीपद दिले जाणार होते. त्यासाठी पटेल यांचे नाव निश्चितही झाले होते. मात्र केंद्रात दोनदा कॅबिनेट मंत्री सांभाळलेल्या प्रफुल पटेल यांनी राज्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिल्याने पक्षाच्या वाट्याचे एक मंत्रीपद शिल्लक आहे. भुजबळ यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती, पण उमेदवारीच दिली गेली नाही. त्यानंतर भुजबळ यांना राज्यसभा लढवण्यास भाजपच्या श्रेष्ठीकडून सांगण्यात आले होते, पण नंतर तेही बारगळले. विधानसभा निवडणूक लढवून ती जिंकल्यानंतर त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले गेले. ती नाराजी दूर करण्यासाठी पटेल यांच्याऐवजी भुजबळ यांची केंद्रात वणी लागली तर पटेल यांचे मंत्रीपद पुन्हा एकदा हुकण्याची शक्यता आहे.