पुणे : पुणे स्टेशन परिसरात उपहारगृहातील कामगाराला भोसकून त्याच्याकडील रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बंडगार्डन पोलिसांकडून अटक करण्यात आली. गौरव भारत धोकडे (वय १९), आकाश बाळू कांबळे (वय १९, दोघे रा. लष्कर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, आरोपींनी केलेल्या हल्ल्यात आत्माराम धर्मा आडे (वय ४२, रा. अशोकनगर, येरवडा, मूळ रा. आर्णे, जि. यवतमाळ) जखमी झाले असून आडे क्वीन्स गार्डनमधील एका क्लबच्या आवारातील उपाहारगृहात वेटर आहेत. सोमवारी मध्यरात्री ते काम संपवून घरी निघाले होते. स्टेशन परिसरातील अलंकार चित्रपटगृहाजवळ ते रिक्षाची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी आरोपी धोकडे आणि कांबळे दुचाकीवरुन आले. त्यांनी आडे यांच्याकडे ५०० रुपये मागितले. आडे यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील कोयता काढून पोटाला लावला.
आडे यांना कोयत्याने भोसकून आरोपी पसार झाले. जखमी अवस्थेतील आडे यांनी याबाबतची तक्रार पोलिसांकडे दिली. पोलिसांनी त्यांना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी तातडीने तपास करुन पसार झालेल्या आरोपींना पकडले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.