मुंबई : झी मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आणि वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी नेहमीच सज्ज असते, म्हणूनच मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेच्या निमित्ताने दररोज १ तासाचा भाग प्रक्षेपित होणार आहे. दररोज मालिकेचा १ तासाचा भाग प्रक्षेपित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
‘लक्ष्मी निवास’ ही कथा आहे, स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न बघणाऱ्या एका मध्यमवर्गीय जोडप्याची, लक्ष्मी एका श्रीमंत घरात वाढलेली मुलगी. श्रीनिवासवर असलेल्या अतोनात प्रेमामुळे तिने त्याच्याशी पळून जाऊन लग्न केले आणि माहेरशी असलेले सगळे संबंध तिला तोडावे लागले. श्रीनिवासकडे स्वतःच्या हक्काचे घर नाही, यावरून झालेला अपमान असह्य झाल्याने तिने स्वतःचे घर होईपर्यंत माहेरी पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला.
लक्ष्मी आणि श्रीनिवासचा संसार उत्तम फुलला. ३ मुले, ३ मुली आणि श्रीनिवासची आई इतके मोठे कुटुंब झाले. आता दोन मुलींची लग्न बाकी आहेत. लक्ष्मी आणि श्रीनिवास समोर अनेक आव्हाने आहेत. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च, पत्रिकेत दोष असलेल्या मुलीचे लग्न जुळवणे, मुली योग्य घरी पडतायेत ना याची काळजी असणे, घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांची मोट बांधून त्यांना एकत्र धरून ठेवणे अशा एक ना अनेक आव्हानांचा सामना या जोडप्याला करावा लागत आहे. कुटुंबासाठी झटताना स्वतःच्या इच्छा मागे सारत लक्ष्मी आणि श्रीनिवासला आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न साकारायचे आहे. या मालिकेचे लेखन करत आहे सायली केदार, तर मालिकेचे निर्माते सुनील भोसले आहेत.