मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या वित्त व नियोजन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर आज सकाळी (मंगळवार 24 डिसेंबर) त्यांनी वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच राज्य शासनातील इतर विभागांच्या संबंधित अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन वित्त व नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती तसेच कामकाजाचा आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खाते वाटपानंतर अजित पवार ॲक्शन मोडवर आले आहेत. आज मंगळवारी मंत्रालयातील त्यांच्या दालनातून कामकाजाला सुरुवात करून सकाळपासूनच बैठकांचा धडाका लावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थ खात्याचा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा घेतला. यापूर्वी हे खातं शंभूराजे देसाई यांच्याकडे होतं. आता अजित पवारांकडे हे खातं आल्यानंतर खात्याच्या सचिवांना बोलावून त्यांच्याकडे खात्याचा आढावा घेतला.
शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार, हिवाळी अधिवेशन, राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झाल्यानंतर आता महायुती सरकारने राज्यकारभाराला सुरुवात केली आहे. राज्याच्या अर्थ खात्याचा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पदाभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका घेत दोन्ही खात्यांचा आढावा घेत कामकाजाला सुरुवात केली.