रायपूर: बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाखाली छत्तीसगडमधील महिलांसाठीच्या महतारी वंदन योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, सनी लिओनीच्या नावाखाली गेले दहा महिने दरमहा हजार रुपये मिळवणाऱ्या भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेसने या योजनेच्या नावाखाली भाजप मोठा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप केला आहे.
छत्तीसगडमधील भाजप सरकारने मार्च महिन्यात महिला सशक्तीकरणाच्या उद्देशाने महतारी वंदन योजना सुरू केली. या योजनेनुसार दारिद्रयरेषेखालील विवाहित महिलांना दरमहा १ हजार रुपये देण्यात येतात. मात्र बस्तर जिल्ह्यातील तालूर गावातील वीरेंद्र जोशी नामक व्यक्ती गेल्या दहा महिन्यांपासून अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाखाली या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे.
एका आरटीआय कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकाराअंतर्गत या योजनेच्या लाभार्थींची माहिती मागवल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला, वीरेंद्र जोशीने भरलेल्या अर्जात लाभार्थी महिलेचे नाव सनी लिओनी, तर तिच्या पतीचे नाव जॉनी सिन्स दिले आहे.
अंगणवाडी केंद्रातून त्याने हा अर्ज केला होता आणि तो मंजूरदेखील झाला, त्यानुसार योजना सुरू झाल्यापासून जोशीने दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे मार्च ते डिसेंबर या कालावधीत १० हजार रुपये मिळवले. हे प्रकरण समोर आल्यानंतर वीरेंद्र जोशीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लाभार्थीची पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. जोशीचे बँक खाते गोठवण्यात आले असून वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसने या मुद्यावरून सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले आहे.
महतारी वंदन योजनेच्या नावाखाली भाजप मोठा भ्रष्टाचार करत असून निम्म्याहून अधिक लाभार्थी भाजपचे समर्थक आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांनी केला. तर या योजनेमुळे काँग्रेसचे धाबे दणाणले असून एका प्रकरणावरून ते संपूर्ण योजना बंद करू पाहत आहेत, असा पलटवार भाजपकडून करण्यात आला. बोगस लाभाची केवळ एक घटना घडली असून चौकशी गुरू असल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी पक्षाने दिली.