पुणे : नाताळ आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवसच उरले आहेत.यासाठी सगळेजण जय्यत तयारीला सुरवातही केली आहे. अशातच आता राज्य सरकारने नाताळ आणि नववर्षानिमित्त राज्यातील खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रूम आणि ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुले ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी विशेषतः 24, 25 आणि 31 डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत लागू असेल. गृह विभागाने याबाबतचे महत्त्वाचे आदेशही जारी केले आहेत.
विशेष म्हणजे येत्या 24, 25 आणि 31 डिसेंबरला राज्यातील खाद्यगृह, हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमीट रुम आणि ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची विनंती केली होती. जनरल सेक्रेटरी, इंडियन हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशन यांनी (दि. 10 डिसेंबर 2024) रोजीच्या पत्रान्वये शासनास ही विनंती केली होती. या विनंतीला आता प्रशासनाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रुम व ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुली राहणार आहे.
दरम्यान, नव वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार चालकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे नागरिकांना ख्रिसमस आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत आपल्या मित्रमंडळींसोबत सेलिब्रेशन करण्याची संधी मिळणार आहे. पोलीसांकडून या काळात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्यास मनाई करण्यात आली असून, ट्रॅफिक पोलीसांच्या पथकाकडून तपासणी केली जाणार आहे.