मोहोळ : एका शेतमालकाचा त्यांच्याच सालगड्याने अत्यंत निघृणपणे खून करून मृतदेहाचे तुकडे करून प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये भरून घराच्या पाठीमागील शोष खड्यात पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. या घटनेमुळे मोहोळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कृष्णा नारायण चामे (वय ५२, रा. काळेवाडी, पुणे, सध्या रा. यल्लमवाडी, ता. मोहोळ) असं खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सचिन भागवत गिरी (वय २५, ता. सांगवी, जि. धाराशिव) असं अटक करण्यात आलेल्या सालगड्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ पोलीस ठाणे येथे १५ डिसेंबर रोजी कृष्णा नारायण चामे हे मिसिंग झाल्याबाबत तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तीन दिवस विविध ठिकाणी शोध घेतला. मात्र, कृष्णा चामे हे मिळून आले नाहीत.
दरम्यान, १७ डिसेंबर रोजी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नमूद मिसिंग व्यक्तीबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केला. सदर अपहरणाच्या तपासात व्यक्तीचे आसपासच्या १० ते १२ गावात आर्थिक व्यवहार असल्याचे दिसून आल्याने त्या सर्व लोकांकडे तपास केला. मात्र, त्यातूनही गुन्ह्याचे तपासयुक्त काही एक मिळून आले नाही. सलग पाच दिवस चामे यांचा तपास करून देखील काहीही भरीव माहिती मिळाली नाही.
सोन्याच्या लोभासाठी केला खून
मात्र, अपहरण झालेल्या व्यक्तीच्या शेतात सालगडी म्हणून राहणारा सचिन गिरी याच्या चौकशीत विसंगती समोर येत होती. तेव्हा सचिन गिरी यास संशयित म्हणून ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता, सदरचा गुन्हा हा त्याने स्वतः केल्याची कबुली दिली. सदरचा गुन्हा हा त्याने आर्थिक कारणाने व सोन्याच्या लोभासाठी केल्याचे सांगितले.
शरीराचे तुकडे करून शोष खड्ड्यात पुरले
मृत कृष्णा चामे यांना आरोपीने डोक्यात हातोडा मारून हत्या केली. त्यानंतर धारदार हत्याराने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते वेगवेगळ्या पॉलीकॅप कॅरीबॅगमध्ये भरून मृताच्या शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरले. तसेच मृताच्या अंगावरील सुमारे १८ ते १९ तोळे सोने, लॉकेट, अंगठ्या व सोन्याचे कडे असे त्याने मृताच्या घरासमोरील खड्यात पुरले. दरम्यान, गुन्ह्याच्या तपासात अधिक तपास करून आणखी सहआरोपी आहेत का? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.