पुणे : पुण्यातील वाघोली येथे भरधाव डंपरने पदपथावरील तिघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची शासकीय मदत, तर जखमींचा संपूर्ण खर्च शासनामार्फत केला जाणार आहे. डंपर चालकास अटक केली असून, डंपर मालकाची देखील चौकशी केली जाणार आहे.
तसेच पारधी समाजाच्या लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. वाघोली येथील केसनंद फाटा येथे झालेल्या अपघातस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी अपघातस्थळी वास्तव्यास असलेल्या इतर नागरिकांशी संवाद साधला.
अपघाताची संपूर्ण माहिती पोलीस उपायुक्त हिमत जाधव यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. याप्रसंगी आमदार ज्ञानेश्वर कटके यांसह पोलीस निरीक्षक पंडित रेजीवाड, पारधी समाजाचे कार्यकर्ते नामदेव भोसले उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून देखील माहिती घेतली. यावेळी पारधी समाजाच्या तरुणांनी अपघाताची माहिती दिली. रोजगारासाठी शहरात यावे लागते, त्यामुळे आम्हाला अमरावतीमध्येच रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीदेखील बेरोजगार तरुणांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.
तर अमरावतीमध्ये शेतजमीन मिळवून देण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी मागणी देखील केली. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात का, असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला? त्यावेळी पैसे मिळत नसल्याचे महिलांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून या सर्वांना शासनाच्या मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळवून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.