पुणे : राज्यात थंडीचा कडाका कमी झाला असून पावसाला अनुकूल वातावरण तयार होत आहे. पुढील दोन दिवसांनंतर राज्यात पावसाचा यलो अलर्ट असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, सध्या राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात यलो अलर्ट
बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. उत्तर तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे हे दाब क्षेत्र येत आहे. यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा येत आहे. त्यामुळे राज्यामध्ये थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच पावसासाठी वातावरण तयार होऊ लागले आहे. राज्याच्या काही भागात पुढील २४ व २५ डिसेंबरदरम्यान ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तर २६ ते २९ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात यलो अलर्ट आहे.
‘या’ भागात विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
सांगली, सातारा, कोल्हापूर, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, नदिड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, हिंगोली या भागात विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, तर काही भागात गारपिटीची शक्यता आहे.
राज्यात सर्वात कमी तापमान मालेगावात
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोमवारी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ, तर विदर्भात तुरळक ठिकाणी लक्षणीय वाढ, तसेच कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान मालेगाव येथे १३.२ अंश सेल्सिअस, तर सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरी येथे ३२.८ अंश सेल्सिअस होते.