पुणे : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करुन निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. ही घटना शहरातील हडपसर परिसरात घडली होती. या घटनेनंतर पुण्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणातील फरार आरोपीला पुणे पोलिसांनी धाराशिव येथून बेड्या ठोकल्या आहेत. आतिश जाधव असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणात आत्तापर्यंत पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, सतीश वाघ हत्याप्रकरणी याआधी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपींची संख्या आता पाचवर पोहचली आहे.
सतीश वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने त्याचं अपहरण करून निर्घुण हत्या ही वैयक्तिकरणास्तव करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. वाघ यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. याप्रकरणी पाच पैकी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली.
नेमकं काय घडलं?
सतीश वाघ यांचं 9 डिसेंबर रोजी पहाटे अज्ञात व्यक्तींकडून चारचाकी गाडीतून अपहरण करण्यात आलं होतं. सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी त्यांचा गाडीतच खून केला असल्याची माहिती समोर आली आहे. वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं.
सतीश वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटात निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी वाघ यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. मांजरी ते यवत या प्रवासादरम्यानच वाघ यांचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.