लोणी काळभोर : वाहन चालकांनो ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आपण दिवसभर गाडी चालवितो, भेटेल त्या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतो. त्यानंतर आपण आपली दैनंदिनी कामे करण्यास व्यस्त होतो. तेल कंपन्यांनी वाहनचालकांच्या सेवेसाठी काही सुविधा फ्री स्वरुपात दिल्या आहेत. यामध्ये इंधनाच्या गुणवत्तेची चाचणी, उपचार किट, आपात्कालिन कॉल, शौचालय, पिण्याचे पाणी व फ्री हवा या सुविधांचा समावेश आहे. मात्र पेट्रोल पंपावरील कंपनीच्या पंक्चर दुकानातून टायर विकत घेत असाल तर तुम्हाला काळजी घेणे खूप महत्वाचे ठरणार आहे. अन्यथा तुमचीही लुट होऊ शकते?
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत एक हिंदुस्थान पेट्रोलियम प्रा. ली. या भारतातील नामांकित तेल कंपनीचा पेट्रोल पंप आहे. या पंपावरून सीएनजी सह पेट्रोल व डीझेलची विक्री केली जाते. या पंपालगत कंपनीचे पंक्चर दुकान आहे. हे दुकान कंपनीने नागरिकांच्या सेवेसाठी सुरु केले आहे. या दुकानातून ग्राहकांना मोफत हवा भरून दिली जाते. मात्र या दुकानातून एमआरपी पेक्षा 300 ते 400 रुपये चढ्या दामाने टायरची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
रविवारी (ता. 22) दुपारी तीनची वेळ होती. दोन दुचाकी चालक उरुळी कांचनकडून लोणी काळभोरकडे चालले होते. तेव्हा त्यांची दुचाकी सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील हिंदुस्थान पेट्रोलियम पंपाजवळ आली असता, दुचाकीचा पाठीमागचा टायर फुटला. तेव्हा त्या दुचाकीवरील दोघांनी त्वरित कंपनीचे पंक्चर दुकान गाठले. तेव्हा टायरमधील ट्यूब कितीला मिळेल? अशी विचारणा केली असता, पंक्चर दुकानावर काम करणाऱ्या मुलाने 400 रुपयांची साद ठोकली.
तेव्हा दुचाकीवरील एकजण म्हणाला, अरे आम्ही बाहेरून आलेलो नाहीत. इथलेच आहेत. योग्य किंमत सांग आणि काम करून घे. तेव्हा पंक्चर वाला म्हणाला, योग्यच किंमत सांगितली आहे. त्यानंतर त्याला एमआरएफ टायरची किंमत विचारली असता, त्यांने १७०० रुपयांची डरकाळी फोडली. व बसविण्यासाठी शेपरेट 100 रुपये द्यावे लागतील. असे सांगितले. त्या दोघांनाही समजले होते. हा टायरवाला आपल्याला लुटत आहे. त्या दोघांनी टायरची चौकशी केली असता. त्यांना टायरची खरी किंमत 1250 रुपये असल्याचे समजले.
त्यानंतर त्या दोन मित्रांपैकी एक जण रिक्षातून कुंजीरवाडीत गेला. एमआरएफच्या शोरूममधून टायर विकत घेतला. आणि पुन्हा दुचाकी पंक्चर झालेल्या ठिकाणी आला. जाण्यायेण्यासाठी २० रुपये, टायरला 1250 व बसविण्यासाठी 50 रुपये असा एकूण १३२० रुपये खर्च आला. यादरम्यान, दोघांचा 40 मिनिटांचा वेळ वाया गेला. मात्र ते दोघे मित्र हुशार असल्याने त्यांची 400 ते 500 रुपयांची आर्थिक फसवणूक टळली आहे.
दरम्यान, तेल कंपन्यांनी वाहनचालकांच्या सुविधांसाठी पंक्चर दुकाने तयार केली आहेत की ग्राहकांना लुटण्यासाठी दुकाने थाटलेली आहेत. असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच एमआरपी च्या किंमतीपेक्षा जादा दराने टायर विक्री करणाऱ्यावर कंपनीकडून काय कारवाई केली जाणार? हेही पाहणे महत्वाचे आहे. तसेच येथून पुढे जर तुम्ही तेल कंपनीच्या पंक्चर दुकानातून टायर विकत घेत असाल? तर आता विचार करण्याची वेळ आली आहे. तुमची फसवणूक टाळण्यासाठी टायर कोठून घ्यायचा हा निर्णय तुम्हीच घ्या.