वाळूज महानगर (छत्रपती संभाजीनगर ): मुलगी दोन महिन्यांची गरोदर असूनही तिच्याकडे पैशाची मागणी करत तिला परपुरुषासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले. यातून तिच्यासह मुलास बेदम मारहाण केल्यानेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत मुलीच्या आईने केला आहे. याप्रकरणी मृत सिमरन परसराम बाथम (२९ रा. सिंधी कॅम्प, लक्ष्मण तलैया, बेदिवली माता जवळ, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) हिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती जहीर नजीर शेख (२० रा. जोगेश्वरी) व त्याची आई नाझिया नजीर शेख यांच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिसांनी रविवारी (दि.२२) गुन्हा दाखल केला आहे.
मृत सिमरनची आई फुलवती परसराम बाथम (४४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या पतीचे २०१६ मध्ये निधन झाले. त्यानंतर सिमरन सात वर्षांपूर्वी वाळूजमध्ये आल्या. येथे सिमरनने सय्यद बाबा नावाच्या मुलाशी लग्न केले होते. त्याच्यापासून तिला चार वर्षांचा एक मुलगा आहे. यानंतर तिने दुसरा विवाह जहीर नजीर शेख याच्याशी २२ जून २०२४ रोजी नोटरी पद्धतीने केला.
काही दिवस चांगले राहिल्यानंतर सिमरनने आईला फोन करून लग्नानंतर जहीर पैशासाठी छळ करू लागला आहे. एवढेच नव्हे तर सिमरन आईला भेटायला ग्वाल्हेरला जात होती, तेव्हाही तो तिला व मुलाला मारहाण करत असे. मुलीच्या सांगण्यावरून आईने अनेकदा जहीरला पैसे दिले होते. तरीही तो मुलीला त्रास देत होता.
दरम्यान, नोव्हेंबरमध्ये सिमरन देवदर्शनासाठी उज्जैनला आली होती. त्यावेळी जहीर तिला इतर पुरुषांसोबत जबरदस्तीने संबंध ठेवण्यास सांगतो, तसे न केल्यास तो तिच्यासह मुलास मारहण करतो, असे सांगितले होते. विशेष म्हणजे हे सर्व तो त्याच्या आईच्या सांगण्यावरून करत असल्याची माहिती सिमरन आईला सांगितली होती.
चारित्र्यावर संशय घेत मारहाण
दरम्यान, १९ डिसेंबर रोजी दुपारी सिमरनने तिच्या आईला व्हिडिओ कॉल करून मी गरोदर असल्याची माहिती सांगितली होती. तथापि पोटातील बाळ माझे नसल्याचा संशय व्यक्त करत पती व सासूने तिच्या पोटावर मारले होते. याशिवाय त्यांनी मला काहीतरी जबरदस्तीने खाण्यास दिले होते, असेही तिने आईला सांगितले होते. यावेळी आरोपी जहीर आणि त्याची आई नाझिया हे दोघेही त्या व्हिडिओ कॉलमध्ये दिसत होते. सिमरनला काहीतरी खायला दिल्यानेच तिची तब्येत बिघडल्याने तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान सिमरनचा मृत्यू
मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला तत्काळ घाटीत दाखल करण्यास डॉक्टरांनी सांगितले होते. घाटीत दाखल करताच डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. त्यानंतर शनिवारी (दि. २१) ग्वाल्हेरहून आल्यावर तिच्यावर अंत्यसंस्कार करून रविवारी पती जहीर नजीर शेख व सासू नाझिया नजीर शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.