शिरुर: सविंदणे (ता. शिरूर) येथील नाथू सोपाना पुंडे यांच्या घराजवळील शेळ्यांचा गोठा व विहिर आहे. शनिवार (दि.२१) रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गोठ्यातील शेळ्यांची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या विहिरीत पडला. यावेळी नागरिकांनी तातडीने वनविभागाला माहिती देवून बिबट्याला विहीरीतून बाहेर काढण्यात आले.
पुंडे याच्या गोठ्याच्या पाठीमागच्या बाजूने बिबट्या शेळीच्या शिकारीसाठी आला. यावेळी शिकार करण्यासाठी गोठ्यावर झेप मारली. मात्र पाठीमागील लोखंडी जाळीचा अंदाज चुकल्याने तो थेट विहिरीत पडल्यानंतर पाण्याचा मोठा आवाज झाल्याने सोपान पुंडे व त्यांचा मुलगा समीर जागे झाले व विहिरीत काय पडले हे शोधण्यासाठी बॅटरी लावून पाहिले असता, त्यांना पाण्यात बिबट्या पोहताना दिसला.
त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावल. सतीश कामठे, काळूराम ढोबळे, दीपक कामठे सोमनाथ पुंडे, संदीप कामठे यांनी बिबट्याचा जीव वाचवण्यासाठी मोटार सुरू करुन पाणी उपसण्यात आले. त्यामुळे बिबट्याला बसण्यासाठी जागा झाली व नंतर उद्योजक माऊली पुंडे यांनी रात्रीच वनमजूर हनुमंत कारकूड यांच्याशी फोनवरून झालेल्या घटनेबाबत संपर्क साधला.
रविवारी सकाळी ८ वाजता वनरक्षक नारायण राठोड, वनमजूर हनुमंत कारकूड व रेस्क्यू टिमचे सुदर्शन खराडे, तुषार पवार, श्रेयश उचाळे, रोहित येवले, शुभम शिस्तार हे सर्वजण घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ग्रामस्थांच्या साहाय्याने बिबट्याला पिंजऱ्याच्या साह्याने सुरक्षित विहिरीच्या बाहेर काढले. यावेळी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.