पुणे: कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भीमअनुयायांना देण्यात येणाऱ्या सर्वच पायाभूत सोयी सुविधा व सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी रविवारी विजयस्तंभ पेरणे येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे सल्लागार व माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे व समिती अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्यासह पेरणे गावाच्या सरपंच उषा वाळके, कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे, माजी ग्रामपंचायत सदस्य साईनाथ वाळके, किरण सोनवणे, दशरथ वाळके व इतर मान्यवर बैठकीत सहभागी झाले होते.
सरपंच उषा वाळके म्हणाल्या की, सध्या विजयस्तंभ पंचक्रोशीत कोणत्याही स्वरूपाचा तणाव नसून गावकरी विजयस्तंभ शौर्यदिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्नशील आहेत. पंचक्रोशीतील सर्वच ग्रामपंचायती अनुयायांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत, असे त्यांनी सांगितले.
यंदाच्या वर्षी उच्चांकी गर्दी होणार असून सर्व अनुयायी हे केवळ अभिवादनासाठीच या ठिकाणी येत असल्याने व गेल्या सात वर्षांपासूनच्या नियोजनात स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने आनंदाचे वातावरण आहे. परभणी येथील घटनेचा कोणताही तणाव उत्सवावर नसून मागील वर्षीपेक्षा अधिक दर्जेदार पद्धतीने यंदा उत्सव साजरा होणार आहे. तरी नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता मोठ्या संख्येने शौर्यदिन कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे डॉ. सिद्धार्थ धेंडे व राहुल डंवाळे यांनी केले.