पुणे: सायबर भामट्यांकडून फसवणुकीचे सत्र कायम असून, शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने दोघांची तसेच बँक खाते व्हेरिफाय करण्याच्या निमित्ताने एका महिलेची अशी २६ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचे तीन स्वतंत्र गुन्हे गुरुवारी (दि. १९) दाखल करण्यात आले. विश्रांतवाडी, कोथरूड आणि मुंढवा पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात हे गुन्हे घडले.
विश्रांतवाडी येथील एका ज्येष्ठ महिलेला शेअर्समधील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष भामट्याने दाखवले होते. त्यानुसार या महिलेने त्याच्या अकाउंटला दहा लाख रुपये पाठवले. त्यानंतर फोन बंद करून हा भामटा पसार झाला. २० मे २०२४ ते २६ मे २०२४ दरम्यान हा प्रकार घडला. याच पद्धतीने कोथरूड येथीलही एका महिलेची दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. २२ नोहेंबर २०२४ ते १ डिसेंबर २०२४ दरम्यान हा प्रकार घडला. त्याचबरोबर मुंढवा येथील एका महिलेची सप्टेंबर २०२४ मध्ये बँक खाते तपासण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्यात आली.
या महिलेला केंद्रीय तपास पथकातून बोलत असल्याचा बहाणा करून एकाने फोन केला. मुंबईहून इराणला पाठवण्यात आलेल्या पार्सलमध्ये जुना पासपोर्ट व क्रेडिट कार्ड आढळले असल्याचे सांगून त्यासाठी बँक खात्याची तपासणी करायची असल्याचे सांगितले. त्यासाठी त्या महिलेकडून तिच्या बँक अकाउंटचा तपशील घेतला. त्यानंतर तिच्या खात्यातून सहा लाख रुपये चोरट्यांनी काढून घेतले. मुंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.