पुणे : माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यालयाने मोठा धक्का दिला आहे. ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात पूजा खेडकर हिने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. मात्र, ट्रायल कोर्टाने पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन देण्याचा नकार दिला होता.
त्यानंतर पूजा खेडकरने या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. पण पूजा खेडकर यांना अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यालयाने देखील नकार दिला आहे. त्यामुळे खेडकर हिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. तसेच तिला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
पूजा खेकर हिला ऑगस्ट महिन्यात अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. मात्र, आता दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे तिच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने सांगितले की, यूपीएससी ही प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेली घटना ही केवळ एका संस्थेविरुद्धच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर समाजाविरुद्ध फसवणूक दर्शवते.
या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी चौकशी आवश्यक आहे,असे न्यायालयाने नमूद केले. यानंतर न्यायालयाने अटकपूर्व याचिका फेटाळल्याचा निर्णय दिला आणि पूजा खेडकर यांना दिलेले अंतरिम संरक्षण काढून घेतले.
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्र धारी सिंह यांनी याचिकेवर निर्णय देताना अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली जात असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी अटकेविरोधात अंतरिम संरक्षण देखील हटवण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. प्रथमदर्शनी पूजा खेडकर यांच्याविरोधात भक्कम केस होऊ शकते. अशा परिस्थितीत कटाच्या तपासासाठी चौकशीची आवश्यकता आहे. एका घटनात्मक संस्थेबरोबरच समाजाचीदेखील फसवणूक केल्याचे हे एक अनोखे प्रकरण आहे, असेही चंद्र धारी सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.