पुणे : वाचनसंस्कृती सक्षम करण्यासाठी सुरू झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यंदाच्या महोत्सवाला १० लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली आणि महोत्सवात सुमारे २५ लाख पुस्तके खरेदी केली आहेत. पुस्तक महोत्सवातून ४० कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी रविवारी दिली.
राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाचा समारोप रविवारी झाला. महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला.
मुख्य संयोजक राजेश पांडे म्हणाले, यंदाच्या पुस्तक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रमांचा भाग बनलेले आणि पुस्तक खरेदीत सहभागी झालेल्यांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यात ५० टक्के तरुण, २५ टक्के लहान मुले, तर त्याचप्रमाणे दीड लाख शालेय विद्यार्थी आणि तितकेच महाविद्यालयीन तरुण यात सहभागी झाले होते.
या महोत्सवात आलेल्या वाचनप्रेमींनी २५ लाखांपेक्षा अधिक पुस्तके खरेदी केली आहेत. १ हजार लेखकांनी पुस्तक प्रदर्शनात भेट दिली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्याचा २ लाखांहून अधिक रसिकांनी आनंद घेतला. पुणे पुस्तक महोत्सवात चार विश्वविक्रम झाले. हे विश्वविक्रम पुस्तकांच्या सहभागानेच झाले.