लोणी काळभोर : पुणे शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी वसुली कलेक्टर अवैध धंदेवाल्यांकडून ”गुड लक”च्या नावाखाली मोठी माया गोळा करीत आहे. ही जमा केलेली माया वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन खुश करत मेहरबानी मिळवत आहे. त्यामुळेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्या मर्जीतील कलेक्टरवर विश्वास ठेवून अवैध धंदेवाल्यांकडून वसुलीची जबाबदारी देत आहेत. तर साहेबांचीही आपल्यावर कृपादृष्टी व्हावी म्हणून देवाकडे साकडे घातल्याप्रमाणे अवैध धंदेचालक कारवाईच्या भीतीने पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या ”गुड लक”च्या फर्माईशी पूर्ण करीत आहेत.
पुणे शहर पोलीस दलातील ”गुड लक”चे लोन आता पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात पोहचले आहे. गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेले सर्वच प्रकारचे अवैध धंदे विधानसभा निवडणुका संपल्यानंतर जिल्ह्यात सुरु झाले आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांना ज्या त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी पाठबळ देऊन परवानग्या दिल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून बंद असलेली माया वसूल करण्याचा सपाटा सुरु केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या अवैध धंदेवाल्यांकडे ”गुड लक”च्या नावाखाली तिप्पटीने अर्थकारणाच्या फर्माईशी सुरु झाल्या आहेत.
शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, सासवड, भोर, वेल्हे, मुळशी, खेड व मावळ या तालुक्यांमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे मागील एक महिन्यांपासून खुलेआम सुरु आहेत. परवाने नसताना जिल्ह्यात अनेक हॉटेल व्यावसायिक बेकायदा मद्यविक्री करत आहेत. तसेच अवैध गावठी दारू, ताडी, गांजा, मटका, गुटखा यांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. याचबरोबर जिल्ह्यातील अनेक लॉजवर देहविक्री व्यवसाय बिनधास्त सुरु आहे. पोलीस ठाण्यातील कलेक्टरने साहेबांच्या ”गुड लक”च्या फर्माईशीसाठी अवैध धंदेवाल्यांकडे तगादा लावला आहे.
पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने हे अवैध धंदे सुरु आहेत. त्यामुळे प्रतिबंध करणारी पोलीस यंत्रणाच कुचकामी झाल्याचे दिसून येत आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील अवैध धंदे सुरु झाल्याचा हा डिसेंबर महिना पहिलाच आहे. या महिन्यात वसुली बहाद्दरांनी अवैध धंदेवाल्यांकडून चार पटीने माया गोळा केली आहे. त्याचबरोबर ‘गुड लक”ची फर्माईश पण दिलेली आहे. त्यामुळे ही गोळा केलेली मोठी माया कोणाच्या घशात जाणार? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सर्व प्रकारचे अवैध धंदे जोरात सुरु आहेत. अवैध धंद्यांच्या वर्चस्व वादातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेल्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या सर्व अवैध धंद्यांचा सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. तर वाढत्या अवैध धंद्यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंदे व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ”गुड लक”च्या फर्माईशी बंद करण्यासाठी जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पंकज देशमुख काय भूमिका घेणार ? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.