पुणे : पुण्यात पादचाऱ्यांचे मोबाइल, घरफोडी, बस मध्ये दागिन्यांची चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशातच आता हडपसर परिसरात पादचारी तरुणाचा मोबाइल चोरट्यांनी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तरुणाने चोरट्यांना विरोध केला असता दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाला फरफटत नेले.
तसेच दुचाकीस्वार चोरट्याबरोबर असलेल्या साथीदाराने तरुणाच्या हाताचा चावा घेऊन मोबाइल चोरुन चोरटे पसार झाल्यची घटना घडली आहे. ही घटना हडपसर भागातील भगीरथीनगर परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. याबाबत एका तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हडपसर भागातील भगीरथीनगर परिसरात राहण्यास आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पादचारी तरुण भगीरथीनगर परिसरातून जात होता. सोसायटीकडे वळत असताना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी तरुणाचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी तरुणाने त्यांना विरोध केला, तसेच चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्याने तरुणाला २०० ते ३०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. एवढचं नाही तर दुचाकीस्वार चोरट्याबरोबर असलेल्या साथीदाराने तरुणाच्या हाताचा जोरदार चावा घेतला. या झटापटीत तरुणाच्या गुडघ्याला दुखापत झाली.
दरम्यान, तरुणाकडील मोबाइल संच चोरुन चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कुदळे करत आहेत.