आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथील जाधव मळ्यात एका शेतकऱ्याच्या एक शेळी व दोन बोकडांचा बिबट्याने फडशा पडल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. २२) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत दत्तात्रय जाधव यांचे ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे रांजणी, जाधववाडी परिसरात शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात रांजणी ते नारायणगाव रस्त्यावर जाधववाडीनजीक रांजणी गावाच्या हद्दीत जाधव मळा आहे. तेथे दत्तात्रय जाधव हे शेतकरी राहतात. त्यांच्याकडे एक शेळी व दोन बोकड अशी ३ जनावरे होती. शनिवारी (दि.२१) सायंकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे घराशेजारील गोठ्यात ही जनावरे बांधली होती. त्यांनी गोठ्याच्या भोवती सात ते फूट उंचीचे तारेचे कुंपण केले आहे.
रविवारी पहाटे दोनचा सुमारास बिबट्याने तीन ठिकाणी कुंपणाची तार वाकवून गोठ्यात प्रवेश करून एक शेळी व दोन बोकडांचा जागीच फडशा पडला. त्यानंतर बिबट्याने जाधव यांच्या घरामागील उसात धूम ठोकली. बिबट्याने तीनही जनावरे ठार केल्याने शेतकरी जाधव यांचे जवळपास ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची खबर मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी विकास भोसले यांना रविवारी सकाळी वनपरिमंडळ अधिकारी प्रदीप कासारे, वनरक्षक सूर्यकांत कदम, वनसेवक महेश टेमगिरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.